
कोस्टल रोडवर भरधाव गाडी चालवून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत कोस्टल रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडल्या आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्यात काही वाहनांनी थेट 140 चा स्पीड गाठल्याचेही कारवाईतून समोर आले. या पार्श्वभूमीवर स्पीड नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.
मुख्य कोस्टल रोडवर 80 किमी प्रतितास, इंटरचेंजरवर 40 किमी प्रतितास आणि बोगद्यात 60 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे जेव्हा रस्ता मोकळा असतो, तेव्हा सर्वाधिक वेगमर्यादेचे उल्लंघन होते. अनेकदा चालकांचे या मार्गावर भरधाव वेगावरील नियंत्रण सुटते. ओव्हरटेकच्या नादात वाहने एकमेकांवर धडकतात. दुसरीकडे, अनेकजण बस लेन, तसेच आपत्कालीन मार्गिकेवरून वाहने नेत असल्याने त्याचाही फटका काsंडीत भर घालून अपघाताला निमंत्रण देत आहे.
ई–चलनद्वारे धडक कारवाई
एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन) हे पॅमेरे जुलै अखेरीस कार्यान्वित झाले, तर ई-चलन प्रणाली 4 सप्टेंबरला बोगद्यांसाठी आणि 27 सप्टेंबरला संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी सुरू झाली आहे. त्यानुसार, ई-चलनद्वारे कारवाईचा वेग वाढला आहे. दिवसाला 500 हून अधिक ई-चलन जारी करण्यात येत आहेत. 8 सप्टेंबर ते 12 जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांनी 61 हजार 989 ई चलान बजावत कोटय़वधींचा दंड ठोठावला आहे.


























































