
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी, चीनची घुसखोरी, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत संसदेत चर्चा टाळल्याचा आरोप केला. तसेच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबतही सखोल चौकशीची मागणी केली.
संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेला मुद्दा हा राष्ट्रीय सुरक्षेशी आणि राष्ट्रहिताशी संबंधित होता. चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असताना भारतीय राजकीय नेतृत्व निर्णय घेण्यात सक्षम असल्याचे दिसले नाही. जनरल मनोज नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात संपूर्ण घटनाक्रम मांडला असून, तो देशासमोर मांडण्यात संसदेत कोणतीही अडचण नव्हती. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसद बंद करून पळ काढल्याचा आरोप त्यांनी केला.
याच धर्तीवर, राज्यसभेत महाराष्ट्रापुरताच नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा असलेला अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाताचा मुद्दा मांडण्यात आला, असे राऊत म्हणाले. अजित पवार यांचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला, तो अपघात नेमका कसा घडला, त्यामागील रहस्य काय आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून टीका होत असल्याचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, मुळात मी स्वतः शंका घेतलेली नाही. ही शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी उपस्थित केली होती. माझ्यासमोरही काही माहिती आली, म्हणून मी हा विषय पुढे नेला.
अजित पवार यांची जुनी वक्तव्ये पाहिल्यानंतर असे लक्षात आले की, ते पुन्हा स्वगृही येण्याच्या मानसिकतेत होते. भारतीय जनता पक्षासोबतचा संसार फार काळ टिकणार नाही, कारण फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने जात असल्याचे त्यांचे मत होते. या भूमिकेवर ते हळूहळू ठाम होत गेले होते आणि त्यांनी जाहीरपणे तसे बोलायलाही सुरुवात केली होती.
15 जानेवारीच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांमध्ये भाजपने कशी लूट केली, याचे पुरावे समोर आणले. पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणातही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला होता, असा दावा राऊत यांनी केला.
अजित पवार अनेक वर्षे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांच्या जवळ अनेक महत्त्वाची कागदपत्रे, फाईल्स आणि पुरावे जमा झाले होते. ही सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यातच होती, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. त्या दिवशीही त्यांच्या सोबत काही फाईल्स किंवा डॉक्युमेंट्स असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, विमान उड्डाणानंतर अवघ्या अर्ध्या तासात अपघात झाला. याबाबत स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी डीजीसीएची असून, भाजपने स्पष्टीकरण देण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी आणि कालमर्यादेत अहवाल सादर करावा, हीच आमची मागणी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. ही माझी एकमेव “चूक” होती की मी हा मुद्दा सर्वांत आधी मांडला. आता हळूहळू लोक मानसिकदृष्ट्या स्थिर झाल्यावर या विषयावर विचार करत आहेत, असे ते म्हणाले.
अजित पवार पहिल्यांदाच विमान प्रवास करत होते असे नाही. ते नेहमीच हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमानाने प्रवास करत असत. त्यामुळे कोणते विमान, कोणता वैमानिक, ही सर्व माहिती व्यवस्था करणाऱ्यांना आधीच माहित असते, असे राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, छगन भुजबळ तसेच अजित पवारांच्या कुटुंबातील काही सदस्यही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय आणि प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्याने महाराष्ट्र या दुःखातून सावरला, असे होणार नाही. हे राजकारण वेगळे आहे, मात्र अजित पवारांच्या मृत्यूबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, असे राऊत म्हणाले.
या घटनेवर प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि नागरी विमान उड्डाण मंत्र्यांनी स्पष्टपणे बोलायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रफुल्ल पटेलांबाबत बोलताना त्यांनी टोला लगावत म्हटले की, त्यांना पक्षाध्यक्ष व्हायची घाई झालेली दिसते.
अलीकडच्या काळात काल आपण पाहिला असेल की संसदेच्या आवारामध्ये अमित शहा आणि प्रफुल पटेल यांचे फोटो आलेत हातात हात घालून असे घट्ट मिठी मारून चाललेले आहेत. म्हणून तर आम्हाला शंका येतात की अजित पवारांच्या बाबतीत ज्या आमच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत. त्या यासाठीच आहेत की अजित पवारांच काही ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून बरं वाईट झालं नाही ना हे दुर्दैव आम्हाला म्हणाव असं वाटतं असेही प्रफुल पटेल म्हणाले.
अजित पवार भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवारांकडे परत आले असते, तर तो ‘ऑपरेशन लोटस’चा सर्वांत मोठा पराभव ठरला असता. त्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा देखील ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा प्रश्न लोक विचारत आहेत, असे राऊत म्हणाले. देशात इतक्या निर्घृण पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे की कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भाजपच्या विरोधात जाईल, तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत जे सत्य मांडले, त्यानंतर नरवणे यांचीही सुरक्षा वाढवावी, अशी मागणी राऊत यांनी केली. भाजप किंवा यंत्रणा काय करतील, याचा भरवसा राहिलेला नाही, असे ते म्हणाले.
























































