लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्याने गदारोळ; विरोधकांचा जोरदार गोंधळ, सभागृहाचे कामकाज तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्यामुळे सभागृहात तीव्र गदारोळ झाला. पीठासीन अधिकारी कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी राहुल गांधींना बोलण्याची संधी न देता पुढील वक्त्यांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. यामुळे समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनीही भाषण करण्यास नकार दिला.

विरोधी पक्षातील खासदार राहुल गांधींच्या समर्थनार्थ सभागृहाच्या वेलमध्ये उतरले आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही खासदारांनी आसनाच्या दिशेने कागदही फेकल्याचे पाहायला मिळाले. या प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज चालू राहू शकले नाही. अखेर पीठासीन अधिकारी कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्राशी संबंधित मुद्दा उपस्थित केला. मला बोलण्यापासून का रोखले जात आहे, मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलू द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. एखाद्या लेखावर आक्षेप असेल, तर मी त्या मुद्द्यावर बोलणार नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी चीनचा उल्लेख करत पूर्व लडाखमध्ये हिंदुस्थानचे सैनिक शहीद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, याच वेळी आसनावरून कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी नरेश उत्तम पटेल यांचे नाव पुकारले. त्यानंतर ते एकामागोमाग एक पुढील वक्त्यांची नावे जाहीर करत राहिले.

लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच राष्ट्रीय सुरक्षेचा विषय उपस्थित केला आणि तो अधिकृत आणि सत्य असल्याचे सांगितले. चीन आणि पाकिस्तानशी संबंधित हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मुद्द्यावर संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, या विषयावर सभापतींच्या बैठकीत चर्चा झाली होती आणि सरकार ऐकून घेण्यास तयार आहे. मात्र, हा मुद्दा सोडून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सर्व गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आणि अखेर सभागृह तहकूब करावे लागले.