
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघातील रस्त्य़ांच्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध विषयांवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच ‘निवडणूक आता संपल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजुला ठेवून लोकांच्या कामांकडे लक्ष द्या, असे आवाहन देखील त्यांना राजकारण्याांना यावेळी केले.
पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”3२ तास लोकांची कोंडी झाली. इतर वेळी फोटो काढायला पुढे जाणारी मंत्रीमंडळातील मंडळी काल कुठे होती. टोल ऑपरेटर्सने नुकसान भरपाई द्यायला हवी. या प्रकरणात चौकशी लावून काय होणार, चौकशी आणि क्लिन चीट ही गेल्या चार वर्षांपासून प्रथा झालीय. या अॅक्सिडन्टला कुणालाही जबाबदार धरता येत नाही. पण त्यांच्याकडून जे काही मॅनेजमेंट व्हायला हवे होते. पाणी वाटप, खाद्य वाटप, मोबाईल टॉयलेट्स होऊ शकत होतं. हे जे मंत्री हेलिकॉप्टर वापरतात ते लोकांच्या मदतीसाठी का नाही वापरले, असे ते म्हणाले.
”मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन गेली आहे. आता आपण राजकारण बाजूला ठेवून महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्यायला हवे. मुंबईतील रस्ते, फुटपाथ, बस सर्व विषय कसे मार्गावर येतील ते पाहायला हवे. गेल्या चार वर्षापासून गोंधळ होता. त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतो की आता मुंबईकरांच्या महत्त्वाच्या विषयांवर कामाला लागा. आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आज आम्ही वरळीतील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”गेल्या चार वर्षात जो निधी वाटप झाला त्यातील 99 टक्के निधी हा सत्ताधाऱ्यांतील लोकांनाच झालेला आहे. कदाचित त्यांनी निवडणूका आहेत म्हणून त्यांनी असे केले असेल. पण निवडणूकीत त्यांनी पाहिले असेल की जनता आमच्यासोबतही उभी राहिली. आता मला त्यांना सांगायचे आहे की, जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींना न्याय देणं गरजेचं आहे. तो जनतेचा आवाज आहे व जनतेच्या आवाजाला न्याय देणं गरजेचा आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.



























































