प्रतिष्ठित पूना क्लबच्या संचालकांना धमकावले, पेट्रोल पंप व्यवहारासाठी धमकी; भाजप प्रवक्त्यांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील प्रतिष्ठीत पुना क्लबमधील पार्किंगमध्ये चारचाकी वाहन आडवून क्लबच्या संचालक महिलेला धमकावण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भाजपचे प्रवक्ते अली दारूवाला यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ३० जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पूना क्लबच्या संचालिका आहेत. ३० जानेवारी रोजी त्या क्लबमधील स्विमिंग पूलच्या पार्किंगमधून आपली चारचाकी गाडी बाहेर काढत होत्या. त्याचवेळी दारुवाला हे त्यांच्या दोन साथीदारासह तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या वाहनाच्या मागे आपली गाडी आडवी लावून फिर्यादींची गाडी बाहेर काढण्यास प्रतिबंध केला. एवढेच नाही तर फिर्यादी यांचा गोल्व्हा नामक व्यक्तीशी असलेला पेट्रोलपंपाचा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुरुवातीला बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान, संबंधित व्यक्तीशी माझा कोणताही वाद नाही. मी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पदाधिकारी आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना व्यवहार पूर्ण करा, असे सांगत होतो. त्या व्यवहारात मी मध्यस्थी असल्याने त्यांना सांगायला गेलो होतो, असे दारूवाला यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले.