बॉलीवूड सिनेसृष्टीतील अभिनेते सुनील थापा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. नेपाळी, बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेपाळी प्रेक्षकांमध्ये ‘राते कैला’ या नावाने लोकप्रिय असलेल्या सुनील थापा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एका अष्टपैलू कलाकाराचा प्रवास थांबला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

सुनील थापा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूडमधून केली होती. दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिली संधी दिली. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक दुजे के लिए’ या गाजलेल्या सिनेमातून त्यांनी पदार्पण केले होते, ज्यात कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 2014 मध्ये आलेल्या ‘मेरी कोम’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. या सिनेमात त्यांनी प्रियांका चोप्राच्या कडक शिस्तीच्या आणि प्रेरणादायी प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ही भूमिका सुरुवातीला अमिताभ बच्चन आणि डॅनी डेन्झोंगपा यांना ऑफर करण्यात आली होती, परंतु अखेर ती त्यांच्या वाट्याला आली आणि त्यांनी तिचे सोने केले.

केवळ अभिनयच नव्हे, तर चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक बाजूंचे ज्ञान देण्यासाठी त्यांनी ‘एव्हरेस्ट फिल्म अकादमी’ देखील चालवली. याद्वारे त्यांनी अनेक नव्या कलाकारांना अभिनय, शिस्त आणि वेळेचे महत्त्व शिकवले. नेपाळी चित्रपटसृष्टीत त्यांचा मोठा आदर होता आणि त्यांना तिथला ‘गब्बर’ मानले जात असे. त्यांच्या निधनामुळे हिंदुस्थानसह नेपाळी चित्रपटसृष्टीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.