
आई बदलापूरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीला उभी आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून भामट्याने सराफाला २८ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण पाटील असे भामट्याने नाव असून त्याने खोटे सोन्याचे दागिने तारण ठेवून अपहार केला. याप्रकरणी सराफ तरुण पोरीया याच्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी प्रवीण पाटील व त्याचा साथीदार रुपेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुण पोरीया यांचे जुनी डोंबिवली येथील खंडोबा मंदिराजवळ ‘राधे गोल्ड आर्ट्स’ नावाचे सराफाचे दुकान आहे.
डिसेंबर महिन्यात प्रवीण पाटील व त्याचा साथीदार रुपेश चव्हाण हे त्यांच्या दुकानात आले. प्रवीणने प्रचारासाठी पैशांची तातडीची गरज असल्याचे सांगितले. तरुण पोरीया यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला १४ ग्रॅम सोन्याची चेन तारण ठेवून १ लाख १० हजार रुपये घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खोट्या सोन्याच्या साखळ्या व ब्रेसलेट तारण ठेवून २८ लाख रुपये घेतले. १५ दिवसांत सर्व पैसे भरून सर्व दागिने सोडवतो असा विश्वास व्यक्त करत धूम ठोकली. मात्र दोन महिने उलटूनही ते दोघेही परत न आल्याने पोरीया यांनी सोन्याची तपासणी केली असता हे दागिने बनावट असल्याचे उघड झाले.




























































