
एलन मस्क यांनी येत्या 10 वर्षांत चंद्रावर शहर वसवण्याची मोठी घोषणा केली. मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्याचे स्वप्न तूर्तास बाजूला सारत मस्क यांच्या स्पेसएक्सने आता चंद्रावर मानवी वस्ती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मंगळापेक्षा चंद्रावर शहर वसवणे अधिक वास्तववादी आणि वेगवान असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, चंद्रावरील प्रकल्प येत्या 10 वर्षांच्या आत पूर्ण केला जाऊ शकतो. याउलट मंगळावर पूर्ण विकसित शहर उभारण्यासाठी 20 वर्षांहून अधिक काळ लागू शकतो. मानवी संस्कृतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चंद्र हा आता सर्वात व्यवहार्य मार्ग असल्याचे मस्क यांना वाटते.
मंगळ मोहीम सुरूच राहणार
चंद्रावर लक्ष केंद्रित केले असले तरी, स्पेसएक्स मंगळावर जाण्याचे स्वप्न सोडणार नाही. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी पुढील 5 ते 7 वर्षांत मंगळावर वस्ती उभारण्याच्या कामाला सुरुवात करेल. याआधी मस्क यांनी 2026 अखेरपर्यंत मंगळावर पहिले विनामानव यान पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
मंगळ ग्रहाची योजना बाजूला का ठेवली
मंगळ ग्रहाची मोहीम ही ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. चंद्रावर जाण्यासाठी केवळ 2 दिवसांचा प्रवास लागतो, तर मंगळावर पोहोचण्यासाठी 6 महिने लागतात. पृथ्वीवरून दर 10 दिवसांनी चंद्रावर यान पाठवता येऊ शकते. मात्र, मंगळासाठी पृथ्वी आणि मंगळ एका विशिष्ट रेषेत येण्याची प्रतीक्षा करावी लागते, जी संधी दर 26 महिन्यांनी एकदाच मिळते. ट्रम्प प्रशासनाने अंतराळ धोरणात बदल केला आहे. आर्टेमिस 3 मोहिमेत 2027 च्या मध्यापर्यंत अंतराळवीरांना पुन्हा चंद्रावर पाठवले जाणार आहे.






























































