
एसटी महामंडळाच्या प्रवासातही आता डिजिटल तिकीट प्रणाली लागू करण्यात येणार आहे. तिकीट प्रणालित पारदर्शकता आणि सुलभता आणण्याच्या हेतूने महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चा (एनसीएमसी) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे एसटीच्या विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी कार्ड’ अनिवार्य असणार आहे.
डिजिटल तिकीट प्रणालीसाठी एसटी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. त्यानुसार लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड, दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत कार्ड वितरण केले जाणार आहे.
बसस्थानकांवर नोंदणीची प्रक्रिया
– नवीन योजनेंतर्गत नोंदणीची प्रक्रिया एसटीच्या बसस्थानकांवरच पार पाडण्यात येणार आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3 हजारांहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त केले आहेत.
– प्रवाशांना नवीन स्मार्ट कार्ड 199 रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यात वॉलेट मर्यादा किमान 100 रुपयांची असेल, तर 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल, असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे.































































