
>> अरविंद दोडे
गूढकथा ही कधी काल्पनिक असते किंवा सत्य घटनेवर आधारित असते. त्या कथेत एखादा गुन्हा किंवा रहस्यमय घटना असते. अशा कथांमध्ये वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा टिकवून ठेण्यासाठी गुप्तहेर, संशयित आणि लपलेले पुरावे यांचा खुबीने वापर करून लेखक गुंतागुंत वाढवतो. शेवटी रहस्याचा, गूढत्वाचा उलगडा होतो. आरंभापासून शेवटपर्यंत पुढे काय होणार? याची उत्सुकता असते. न उलगडणारं कोडं हा तर कथेचा केंद्रबिंदू! कथेत लपलेले संकेत असतात. त्यांचा परस्परांशी अर्थ लावून लेखक हलकेच वाचकाला कथेच्या शेवटापर्यंत नेतो. गूढत्वाचा अर्थ काढणे हे तो वाचकांवर सोपवतो. या प्रकारात मानवी संवेदनापलीकडील किंवा विज्ञानालाही न उलगडणाऱया विषयांचाही समावेश असू शकतो. विदेशात रहस्यकथा आणि गूढकथा एकच प्रकार मानतात. हा प्रकार तिथे लोकप्रिय आहे. प्रख्यात अमेरिकन लेखक, कवी, संपादक, समीक्षक एडगर अॅलन पो (इ.स. 1809 ते 1849) यांना अमेरिकन स्वच्छंदवादाचा अध्वर्यू समजले जाते. या लेखकाने सर्वप्रथम रहस्य, गूढकथेचा पाया रचला. त्यांची ‘द मर्डर्स इन द रू मोर्ग’ ही लघुकथा पहिली आधुनिक गूढ किंवा रहस्यकथा मानली जाते. आपल्या मराठी साहित्य विश्वात प्रख्यात लेखक जी. ए. कुलकर्णी, नारायण धारप, रत्नाकर मतकरी ते अगदी अलीकडचे लेखक हृषीकेश गुप्ते यांनी गूढकथेचे दालन समृद्ध केले आहे. हाच वारसा समर्थपणे पुढे नेणारे ठाण्याचे कवी, चित्रकार रामदास खरे यांचा ‘साईड इफेक्ट्स’ हा नुकताच कोरा गूढकथा संग्रह डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. यापूर्वी त्यांचा ‘केमिस्ट्री’ हा गूढकथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यालाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
‘साईड इफेक्टस्’ या संग्रहात एकूण बारा कथा आहेत आणि त्या वेगवेगळ्या नियतकालिकांतून यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. गूढकथेचे खरे मर्म खरे यांना पुरते समजले आहे. माणसांच्या विचित्र स्वभावदर्शनाचा, वैगुण्याचा आणि भवतालात व्यापून उरलेल्या गूढत्वाचा शोध लेखकाने कथांमधून घेतलेला दिसतो. पहिल्याच ‘अबाधित’ कथेतून कोकणातल्या आजच्या काळाचे प्रत्ययकारी चित्रण उभं केलं आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा होणारा विनाश, तंटे, राजकारण आणि उद्ध्वस्त नातीगोती हे विणताना कथा एका भयानक वळणावर येऊन ठेपते. ‘डायरी’ कथेतून सुखाच्यापाठी धावणाऱया माणसाचे भयावह दर्शन रेखाटले आहे. ‘काळीशार गर्द सावली’ कथेत अमानवी संवेदनांची चाहूल लागते. ‘कोंड’ ही कथा पुन्हा कोकणातल्या पार्श्वभूमीवरची. अतिशय वेगळी. ‘जाळं’ कथेत मोबाईलचे भीषण दुष्परिणाम दाखवले आहेत. तर शेवटची ‘साईड इफेक्टस्’ ही कथा वाचताना मृत्यूची मालिका, गूढतेचे सावट, त्यातली गुंतागुंत वाचकाला अस्वस्थ करते.
लेखक आपल्या मनोगतातून संवाद साधताना म्हणतो, ‘माणसाचं मन चित्रविचित्र संदर्भांनी काठोकाठ भरलेलं आहे. त्यातील मानवी स्वभावाचं दर्शन मी कथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’ तर या संग्रहाची पाठराखण लेखक, समीक्षक गणेश मतकरी यांनी नेमक्या शब्दात केली आहे. ते म्हणतात, ‘विविध व्यक्तिरेखांच्या आयुष्यात उभे राहणारे पेच, त्यांना ठराविक साच्यातून बाहेर काढतात. त्यांच्याकडे पाहण्याचा एक नवा, अनपेक्षित पैलू लेखक आपल्यापुढे ठेवतात.’ ‘साईड इफेक्ट्स’चे स्वागत वाचक रसिक नक्कीच करतील असा विश्वास आहे.
साईड इफेक्टस् (गूढकथा संग्रह)
लेखक – रामदास खरे
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
पृष्ठे – 122, n मूल्य – रु. 200/-




























































