परीक्षण – एक तरी ‘पंच’ अनुभवावा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश कदम

दिसणं आणि बघणं एकच असतं का? दिसलेली प्रत्येक गोष्ट पाहिली असं आपण म्हणू शकतो का?… म्हणजे दिसतं तर सगळं, पण ते आपल्याकडून बघितलं जातं का?… नाही समजलं? गोंधळून गेलात? हा गोंधळ दूर करायचा असेल तर सॅबी परेरा यांचं ‘तिसरा पंच’ हे पुस्तक वाचावं लागेल. यातल्या वाक्या-वाक्यात तुम्हाला वरच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही चाट पडाल! अरेच्चा, हे तर आपल्यालाही दिसतं, हे आपल्यालाही माहीत आहे, पण आपण या गोष्टीकडं असं कधी बघितलंच नव्हतं.

असं काय आहे या पुस्तकात? ‘लग्न करताना आपण मुलामुलीची कुंडली जुळवतो. खरं म्हणजे, कुंडली सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा तर बिचारा कुठेही अॅडजस्ट करून घेतो… ’ ,पूर्वी आपण भारताची तुलना युरोपअमेरिकेशी करायचो आणि विकासाच्या बाबतीत किती मागे आहोत म्हणून सरकारला दूषणं द्यायचो. आता आपण आपली तुलना पाकिस्तानअफगाणिस्तानशी करतो आणि त्यांच्यापेक्षा किती सुरक्षित आहोत म्हणून सरकारला धन्यवाद देतो…’ ही दोन वाक्यं पुस्तकात काय आहे हे सांगण्यास पुरेशी आहेत. खरं तर गंमत पुस्तकाच्या नावापासूनच आहे. ‘तिसरा पंच’ म्हटलं की आपल्याला क्रिकेटमधल्या तिसऱया पंचाची आठवण होते. या पुस्तकाचा लेखक तिसऱया पंचाच्या भूमिकेत आहे हे खरेच, पण तो निर्णय देत नाही. तो फक्त वास्तव आपल्यासमोर ठेवतो आणि आपण हिट विकेट होत राहतो.

‘तिसरा पंच’ म्हणजे सॅबी परेरा यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत, नियतकालिकांत लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. मात्र तो तत्कालीक नाही. हे आधी छापून आलंय असं सांगितलं नसतं तर कळलंही नसतं, इतकं हे लिखाण कालातीत आणि सदाबहार आहे. गाणं शिकायचं असेल तर गाणं ऐकता यायला हवं अशी पूर्वअट असते. ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं तर गाणं शिकणारा विद्यार्थी आगगाडीच्या ठेक्याबरोबर गायला नाही तर त्यानं गाण्याचा क्लास सोडून टायपिंगचा क्लास जॉइन करावा. लिखाणाचंही तसंच आहे. लिहिण्यासाठी तुम्ही किती वाचता हे महत्त्वाचं असतं. आणि विनोदी लिहिण्यासाठी त्यापुढची निरीक्षणाची अट असते. सॅबी परेरा हे तसं वाचून लिहिणारे लेखक आहेत हे सतत जाणवत राहतं. कारण रीडर्स डायजेस्टपासून रिफ्युजी सिनेमापर्यंत आणि जपानच्या वर्क कल्चरपर्यंतचे सगळे संदर्भ आणि माहिती त्यांच्या लिखाणात येते.

मोठ्या विनोदाचं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे स्वतवर हसता येणं. सॅबी परेरा हा निकषही पूर्ण करतात, स्वतवर हसण्याचं धाडस दाखवतात. त्यामुळं त्यांचा विनोद अधिक प्रभावी ठरतो. सॅबी परेरांचं लिखाण म्हणजे ‘मुका मार’ आहे. मुका मार दिसत नाही पण लागलेला असतो. इथंही तसंच आहे. पुस्तक वाचून आपण हसतो, पण आत कुठं तरी मार बसत राहतो. काहीतरी ठणकत राहतं. हे ठणकणं जालीम आहे. आरसा दाखवणारं आहे, पण दुखावणारं नाही.

हल्ली घटस्फोट इतके कॉमन झालेत की काहीतरी वेगळं करावं म्हणून मी आणि माझी बायको एकत्र राहतोय   किंवा मी पुरोगामी असल्याने सरकारी खर्चानं मला एक ना एक दिवस पाकिस्तानला पाठवलं जाणारच आहे. मग त्यावर वेगळा खर्च करावा कशाला?… सामाजिक वास्तवावर इतकी झणझणीत विनोदी टिप्पणी क्वचितच वाचायला मिळते. हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. वास्तवाची कडू गोळी विनोदाच्या पाकात घोळून देणारी असंख्य वाक्यं या पुस्तकात आहेत. ‘हल्लीची पुस्तक परीक्षणं चांगली असतात, पण पुस्तक पूर्ण वाचून ती लिहिलेली असावीत एवढीच अपेक्षा आहे…’ अशी फेसबुक पोस्ट कोणत्याही क्षणी समोर येईल ही शक्यता गृहीत धरून काही पुस्तकांचं परीक्षण करावं लागतं. हे पुस्तक त्यातलंच आहे.

‘ग्रंथाली’ प्रकाशनाने अत्यंत नेटक्या स्वरूपात हे पुस्तक वाचकांपर्यंत आणलं आहे. मुकेश माचकर यांनी विनोदी अंगाने लिहिलेली प्रस्तावना पुस्तकाविषयीची उत्सुकता कमालीची वाढवणारी आहे. एकटे असाल, मन लागत नसेल, प्रवास करत असाल, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही परिस्थितीत कुठलंही पान उघडावं आणि सुरू करावं… एक तरी ‘पंच’ अनुभवावा!