
महाराष्ट्र पोलीस दलाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जातिवाचक अपमान आणि छळ होत असल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने (PI) केला आहे. या प्रकरणात 2 पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांसह ७ अधिकाऱ्यांवर पीआयने गंभीर आरोप केले आहेत. तसेच थेट डीजीपींना पत्र लिहिले असून कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिला आहे. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले याला एका प्रकरणात सहकार्य करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही पीआयने केला आहे.
रायगडच्या महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. सतत जातीवाचक अपमान, छळ आणि मानसिक त्रासामुळे आपण आणि आपले कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. या पत्रात दोन पोलीस अधीक्षकांसह सात अधिकाऱ्यांची नावे आहेत. माझ्यासह कुटुबांच्या आत्महत्येला हेच जबाबदार असतील, असे तडवी यांनी पत्रात म्हटले आहे. आपण आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने ‘खालच्या जातीचा’ म्हणून हिणवले जाते. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी ‘तू खालच्या जातीचा आहेस, तू इथं कसा राहतो तेच बघतो, काही झालं तरी तुझी बदली करणार’ अशी धमकी दिल्याचा आरोप तडवी यांनी केला आहे. तसेच शंकर काळे आणि जिवन माने यांनी सध्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे बदनामी करण्यास सुरुवात केली आणि त्यांना सतत मानसिक त्रास दिला, ज्यामुळे परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे रमेश तडवी यांनी म्हटले आहे.
तडवी यांनी आरोप केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे –
> सोमनाथ घार्गे – तत्कालीन पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग
> आंचल दलाल – पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग
> अभिजीत शिवथरे – अपर पोलीस अधीक्षक, रायगड
> शंकर काळे – उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड
> सविता गर्जे – उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन
> मिलिंद खोपडे – पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अलिबाग
> जीवन हिंदुराव माने – सपोनि/ महाड एमआयडीसी पोलिस ठाणे
भरत गोगावलेंचा मुलगा विकासला सहकार्य करण्यासाठी दबाव – तडवी
महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात झालेल्या भांडणावरून दोन गुन्हे दाखल झाले होते. एका गुन्ह्यात मंत्री भारत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आरोपी होता. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी अभिजित शिवथरे, शंकर काळे, मिलिंद खोपडे यांनी बनाव करून या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीनजणांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे. मात्र, बेकायदेशीर अटक करण्यास नकार दिल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा तडवी यांनी केला आहे. वारंवार जातीवाचक बोलून अपमान करण्यात आला आणि त्यांची विनाकारण बदनामी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार जातीवाचक बोलून अपमान करण्यात आला आणि त्यांची विनाकारण बदनामी करण्यात आली, असा आरोप रमेश तडवी यांनी केला आहे.


























































