
पत्नी पतीला न सांगता माहेरी गेली असेल अन् ती त्या रात्री माहेरी थांबल्यामुळे संतापलेल्या पतीने जर तिला चापट मारली असेल तर याला क्रूरता म्हणता येत नाही, असा निर्वाळा देत गुजरात उच्च न्यायालयाने एका जुन्या प्रकरणामध्ये पतीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश गीता गोपी यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
न्यायाधीश गीता गोपी यांनी आपल्या आदेशात म्हटले की, क्रूरता सिद्ध करण्यासाठी सतत आणि असह्य मारहाणीचे ठोस पुरावे न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या प्रकरणातसुद्धा ठोस पुरावे दाखवावे लागतील. आरोपीने जे काही केले आहे त्याचा आणि आत्महत्येमध्ये जवळचा संबंध असायला हवा. परंतु पतीने पत्नीला मारलेल्या चापटमध्ये तसा संबंध दिसत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. दिलीपभाई मंगलाभाई वरली यांच्याविरोधात 1996 मध्ये सत्र न्यायालयाने पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत त्यांना 306 कलमांतर्गत 7 वर्षे आणि कलम 498 ए अंतर्गत एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला दिलीपभाई यांनी 2003 मध्ये आव्हान दिले होते.
ठोस पुरावा आवश्यक
हुंडय़ाची मागणी किंवा चिथावणी दिल्याचा कोणताही पुरावा नाही. दिलीपभाई यांच्यावर केलेले आरोप सामान्य आहेत, असा युक्तीवाद वकील धवल व्यास यांच्याकडून करण्यात आला. पतीला रात्री बॅन्जो वाजवण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याने घरी यायला उशीर व्हायचा. या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होता. फिर्यादी पक्ष सततची क्रूरता, वैद्यकीय नोंदी किंवा पूर्वीच्या तक्रारी सादर करू शकला नाही. शिक्षेसाठी ठोस पुरावा नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता केली जात आहे, असे कोर्टाने म्हटले.


























































