
कुलाब्यातील ज्या मैदानाच्या मातीत हिंदुस्थान आणि महाराष्ट्रासाठी खेळणारे अनेक गुणवंत फुटबॉलपटू घडले तेच कुलाबा बॅकगार्डन अर्थात बिना चंद्रशेखर मनोरंजन मैदान वाचवण्यासाठी क्रीडाप्रेमी एकवटले आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली या मैदानातील नैसर्गिक पृष्ठभाग काढून पृत्रिम गवत बसवण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष, स्थानिक आमदार राहुल नार्वेकर आणि त्यांच्या पुटुंबीयांच्या अट्टहासामुळे स्थानिक फुटबॉलपटूंच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यासंदर्भात कुलाबा बॅकगार्डन बचाव समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हे मैदान वाचवण्याची मागणी केली.
कुलाबा बॅकगार्डनचे नैसर्गिक स्वरूप जतन करण्यासाठी स्थानिकांनी वारंवार निवेदने देऊन प्रशासनाकडे पुनर्विचाराची मागणी केली होती. या मैदानाच्या पृष्ठभागात कायमस्वरूपी बदल करण्यापूर्वी स्थानिक क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, माजी खेळाडू आणि नागरिकांचे म्हणणे ऐकणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी होती. पण संबंधितांना विश्वासात न घेता अचानक कामास सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच स्थानिक खेळाडू आणि नागरिक मैदानात दाखल झाले आणि त्यांनी काम बंद पाडले, अशी माहिती कुलाबा बॅकगार्डन बचाव समितीचे जितेंद्र तांडेल यांनी दिली.
या बैठकीला कुलाबा बॅकगार्डन बचाव समितीचे कार्यवाह सदस्य जितेंद्र तांडेल, वैभव नाखवा, रमेश पवार, सुधाकर राणे, शिवलाल यादव, गौरव पाटील, प्रदीप तांडेल, विनोद नाईक, देवेंद्र तांडेल आदी उपस्थित होते.


























































