
शिवसेनेतून भाजपात गेलेले अद्वय हिरे यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून गिरणा सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स जमा करताना कथित घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. यामुळे कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. दोन्ही बाजूने समझोता झाल्याने मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरुद्धचा मालेगाव न्यायालयातील अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा साखर कारखाना वाचवण्यासाठी शेतकऱयांकडून पैसे गोळा करून मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींची फसवणूक केली, याची ईडीने चौकशी करावी, अशी तक्रार खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये 22 जून 2023 रोजी प्रसिद्ध झाले. याबाबत मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात धाव घेतली होती.
यावेळी उपनेते दत्ता गायकवाड, ग्रामीण जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, नितीन आहेर, माजी आमदार वसंत गीते आदी उपस्थित होते.
आता अद्वय हिरे यांनीच लढावं – संजय राऊत
शेतकऱयांकडून पैसे घेतले तर गिरणा साखर कारखाना पुन्हा उभा राहिला पाहिजे, अशी आमची भूमिका होती. हे संपूर्ण प्रकरण निर्माण करणारे अद्वय हिरे आता सत्ताधारी भाजपमध्ये गेले आहेत, त्यांनी यासंदर्भात काय ते पुढे लढावं, भांडावं, त्यांच्याकडील चुकीच्या माहितीच्या आधारावर मी वक्तव्यं केलं होतं, असे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

























































