
शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची पुरती दुरवस्था झाली आहे. भिंतीचा ताबा बांडगुळे, झाडाझुडपांनी घेतल्याने हे निवासस्थान अक्षरशः भूतबंगला बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याची दुरुस्ती न केल्यामुळे या ठिकाणी साप, विंचूचा वावर असतो. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथे मुक्काम करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अतिदुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागात असलेल्या टाकीपठार परिसरातील आदिवासींना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी २००६-०७ साली सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. या आरोग्य केंद्रात १३ ग्रामपंचायतीमधील २४ गावे आणि ३८ पाड्यांमधील नागरिक उपचार घेण्यासाठी येतात. दोन वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्यसेवक, सुपरवायझर, मलेरिया अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, शिपाई आदी या केंद्रात कार्यरत आहेत. विंचू, सर्पदंश, घटसर्प, थंडी, ताप, मलेरिया, गर्भवती माता अशा जवळपास शंभर रुग्णांवर रोज उपचार करण्यात येतात.
तत्काळ कार्यवाही
टाकी पठार आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय आधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या निवासस्थानाची प्रचंड दैना झाली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे निवासस्थानाला झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. टाकीपठार आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाची तातडीने साफसफाई करण्याबाबत रूपाली ढोणे यांच्याशी चर्चा वैद्यकीय अधिकारी डॉ. करून तत्काळ कार्यवाही करण्यात येईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे यांनी सांगितले.





























































