मोबाईलचा वाद टोकाला गेला, संतापलेल्या पतीकडून पत्नी आणि मुलावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील अंधेरी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवरून झालेल्या वादातून पतीने पत्नी आणि मुलावर कोयत्याने वार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींवर जोगेश्वरीतील ट्रामा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्नासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

संतोष फकीरा राऊत असे आरोपीचे, तर नीता विश्वनाथ भोपळे असे जखमी पत्नीचे नाव आहे. नीताची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका निवासी इमारतीत 13 व्या मजल्यावर नीता तिचा पती संतोष आणि त्यांच्या दोन मुलांसह राहतात. नीता नोकरी करते, तर संतोष बेरोजगार असल्याचे कळते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या जोडप्यात क्षुल्लक घरगुती कारणांवरून वारंवार भांडणे होत होती. आरोपीने अनेकदा पत्नीला मारहाण केली. नीता घरी तिचा मोबाईल पाहत असताना फोन आणि इतर कौटुंबिक कारणातून जोडप्यामध्ये पुन्हा वाद झाला. पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि संतोषने पत्नी आणि मुलावर कोयत्याने वार केला.