तोंडातून फेस, माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाचा मनालीत संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे नातू वीर सोरेन यांचा हिमाचल प्रदेशातील मनाली येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीर सोरेन आपल्या मित्रांसोबत चार दिवसांच्या सहलीसाठी मनालीला आले होते. उंचावरील वातावरणामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक स्तरावर सांगितले जात असले तरी, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी वीर सोरेन यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते मित्रांसोबत बाहेर फिरायला न जाता हॉटेलच्या खोलीतच थांबले होते. दुपारी जेव्हा मित्र परतले, तेव्हा वीर यांनी तीव्र डोकेदुखीची तक्रार केली. त्यानंतर मित्रांनी ऑनलाईन औषधे मागवून त्यांना दिली आणि वीर झोपण्यासाठी गेले. मात्र, काही वेळाने खोलीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आल्याने मित्र धावत आत गेले, तेव्हा वीर जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले.

मित्रांनी तातडीने त्यांना मनाली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हेलिकॉप्टरने तातडीने मनालीत दाखल झाले.

पोलिसांनी याप्रकरणी वीर यांचा मित्र अग्नय वर्मा याचा जबाब नोंदवला आहे. चंपई सोरेन आणि कुटुंबीयांनी वीर यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला असून, मृतदेह आपल्या गावी नेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर कुटुंबीय हेलिकॉप्टरने मृतदेह घेऊन झारखंडकडे रवाना झाले. मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी सांगितले की, वीर यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. कुटुंबाने शवविच्छेदनास नकार दिला असला तरी, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.