
>> दुर्गेश आखाडे
कोकणात गणेशोत्सव हा घराघरातला मोठा सण, तर शिमगा हा गावातला मोठा सण. गणेशोत्सव भावकीला एकत्र आणतो, तर शिमगा गावकीला एकत्र आणतो. कोकणात होळी सणाला शिमगा म्हटले जाते आणि शिमग्याच्या निमित्ताने प्रत्येक गावच्या ग्रामदैवताची पालखी गावात फिरवली जाते. या धार्मिक प्रथांसोबतच काही आगळ्यावेगळ्या प्रथाही यानिमित्ताने दिसून येतात.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील व्होल्टे होम प्रसिद्ध आहेत. गावात होळी पेटवली जाते. त्या होळीतील जळकी लाकडे म्हणजेच व्होल्टे चक्क एकमेकांवर फेकले जातात. हा व्होल्टे होम पाहण्यासाठी मुंबईसह कोकणातील अन्य भागांतून मंडळी येतात. सावर्डे येथील केदारनाथ ग्रामदैवताला साक्ष ठेवून शिमगा साजरा केला जातो. सावर्डे येथे नवव्या दिवशी हे व्होल्टे होम खेळले जातात.ज्या व्यक्तीला व्होल्टे होम खेळायचे आहेत ती व्यक्ती आदल्या दिवशी उपवास धरते. व्होल्टे म्हणजे अर्धवट जळालेली लाकडे. हे व्होल्टे एकमेकांवर फेकले जातात. सावर्डे गावात व्होल्टे होम ही परंपरा आजच्या पिढीनेही जपली आहे.
असा असतो व्होल्टे होम
खोत आणि मानकरी असे दोन विभाग करतात. एका खुल्या मैदानात एका बाजूला खोत आणि दुसऱया बाजूला मानकरी उभे राहतात. नऊ दिवस पेटवलेल्या होळीतील अर्धी जळलेली लाकडे घेऊन येतात. ती लाकडे एकत्र करून पुन्हा पेटवतात. अर्धी जळालेली लाकडे म्हणजे व्होल्टे हातात घेतात. हे व्होल्टे एकमेकांच्या अंगावर फेकले जातात. व्होल्टे होम रात्रीच्या वेळी खेळला जातो. त्यामुळे जळके लाकूड रात्रीच्या वेळी पटकन दिसते आणि ते चुकवता येते. व्होल्टे होम खेळताना कुणीही जखमी होत नाही. शिमग्याचा हा आगळावेगळा प्रकार म्हणजे व्होल्टे होम सावर्डेत खेळला जातो. हा शिमगा पाहण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून मंडळी सावर्डेत येतात.

























































