इराणचे शासन म्हणजे मध्य पूर्वेकडील देशांना लागलेला कर्करोग; बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका- इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. दररोज हे देश एकमेकांच्या तळांवर हल्ले करत आहेत. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांना देखील लक्ष्य केले आहे. या सर्व परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना बॉलिवूडमधील अभिनेत्री व मूळची इराणची असलेली मंदाना करिमी हिने इराणच्या राजवटीला फटकारले आहे. इराणमधील राजवट ही मध्य पूर्वेकडील देशांना लागलेला कर्करोग आहे, अशा शब्दात मंदानाने तिचा संताप व्यक्त केला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना तिने ही प्रतिक्रिया दिली आहे.

”गेली अनेक वर्ष इराणमधील लोकं रिकाम्या हाताने तिथल्या परिस्थितीशी लढा देत आहेत. या लढ्यात आम्ही आमची माणसं गमावली. आमच्या आई, मुलं, नातेवाईक, अनेक विद्यापीठं… अशी मोठी यादी आहे. कुणीही मृत्यू साजरा करत नाही. पण या सरकारने जे काही आमच्यासोबत केले. तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बघत आला आहात. एक हजार लोकांची सामूहिक हत्या झाली. तेव्हा इराणमधील काही लोकांनी त्यांच्या स्वत:च्या लोकांच्या मृत्यूचा जल्लोष साजरा केला. आम्ही गेली अनेक वर्ष जगाकडे मदत मागत आहोत. हे सकार, हे शासन एका कर्करोगाच्या गाठीसारखे आहे. मध्य पूर्वेला लागलेली कर्करोगाची गाठ आहे. आम्ही त्याच्याशी गेली 48 वर्ष लढा देतोय”, असे मंदाना म्हणाली.