
इराण युद्धामुळे शेकडो हिंदुस्थानी आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवैतमध्ये अडकल्याने त्या चिंतेत पडल्या आहेत. आज त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय, मदत करा, अशी आर्त हाक त्यांनी देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांना दिली आहे.
विशाखा सुभेदार या व्हिडीओमध्ये अश्रूभरल्या डोळ्यांनी व्यथा सांगताना दिसत आहेत. त्यांचा मुलगा अभिनय हा कुवेतमध्ये अडकला आहे. त्याला सुखरूप परत आणण्यासाठी मदत करावी अशी कळकळीची विनंती त्यांनी या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केली. अभिनय हा लंडनच्या दिशेने निघाला होता, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याचे विमान कुवैतमध्ये उतरवण्यात आले. उड्डाणे रद्द झाल्याने त्याला परतणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या चार दिवसांपासून तो अडकून पडला आहे.



























































