
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता अधिवेशन काळात सभागृहातील चर्चेच्या वेळेस अनुपस्थित राहणारे उपसचिव व सहसचिव दर्जाच्या अधिकाऱयांनाही सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित राहण्याचे आदेश संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जारी केले आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये लोकप्रतिनिधी विविध विषयांवर प्रश्न-समस्या मांडतात तेव्हा सभागृहात मंत्री असतात; पण अधिकारी वर्ग उपस्थित नसतो. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला दांडी मारल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यापाठापोठ आता विधिमंडळ सभागृहात कामकाज सुरू असताना विभागाचे उपसचिव तसेच सहसचिव दर्जाच्या अधिकाऱयांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे आदेश संसदीय कार्य मंत्री चंद्रकात पाटील यांनी जारी केले आहेत.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून नाराजी
विधिमंडळाच्या सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण, पुरवणी मागण्या तसेच अन्य कामकाज सुरू असताना आमदार हे मंत्रालयीन विभागांशी संबंधित मुद्दय़ांवर जनतेच्या प्रश्नांवर मुद्दे मांडतात. या चर्चेदरम्यान मंत्रालयातील विविध मुद्दय़ांवर विधिमंडळ सदस्यांकडून चर्चा उपस्थित करून त्यावर तत्काळ कार्यवाहीची मागणी केली जाते. अशा आमदारांच्या मुद्दय़ांची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठी सभागृहाच्या गॅलरीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याबाद्दलची तक्रार विधिमंडळ सदस्यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात केली आहे.
आदेशात काय म्हटले आहे…
या बाबीची गंभीर नोंद घेऊन मंत्रालयातील उपसचिव–सहसचिव दर्जाच्या अधिकाऱयांनी सभागृहात राज्यपालांचे भाषण, पुरवणी मागण्या, अर्थसंकल्पावर चर्चा, अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना तसेच अन्य कामकाज सुरू असताना सभागृहाच्या गॅलरीमध्ये उपस्थित राहण्याबाबत तसेच अधिवेशन कालावधीत सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून मंत्रालयातील सर्व विभागाच्या सचिवांना निर्देश द्यावेत, असे संसदीय कार्य मंत्र्यांनी मुख्य सचिवांसाठी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.



























































