
पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्या रिल्स येऊ द्यायच्या नसतील तर मोदींनी खुर्ची खाली करावी, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. भाजपला देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मोदी यांना पायउतार करावेच लागेल, असे ते म्हणाले.
आंबेडकर यांनी आपल्या भाषणाचा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. त्यात मोदींवर शरसंधान केले आहे. आम्ही भाजपवाल्यांचा राजीनामा मागत नाही. सत्ता भाजपचीच राहणार नाही. कारण लोकांनी पाच वर्षांसाठी भाजपला निवडून दिले आहे. तुम्ही निवडणूक घेणार नाही. सत्ता तुमचीच राहील, पण सत्ता राहत असताना देशाचे सार्वभौमत्व कायम राहिले पाहिजे. त्यासाठी भाजपला नरेंद्र मोदींचा राजकीय बळी द्यावा लागेल, असे आंबेडकर म्हणाले.


























































