Us Israel Iran War – बहरीनमध्ये 100 हून अधिक हिंदुस्थानी नागरिक अडकले, कुटुंबाकडून मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-इस्रायलमधील संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहेत. यामुळे बहरीनला गेलेले तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक तेलुगू कुटुंबे तिथे अडकली आहेत. हे सर्व जण 24 फेब्रुवारी रोजी चार दिवसांच्या पर्यटन व्हिसावर बहरीनला गेले होते. हवाई क्षेत्र बंद झाल्याने सर्वजण बहरीनमध्ये अडकले आहेत.

बहरीनची राजधानी माना येथील हॉटेल्स आणि अपार्टमेंटमध्ये सध्या ते राहत आहेत. आखाती देशांतील परिस्थिती अचानक बिघडल्यानंतर विमाने रद्द करण्यात आली, हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ल्याच्या अलर्टनंतर चेक-इन काउंटर देखील बंद करण्यात आले. यामुळे शेकडो हिंदुस्थानी नागरिकांनी स्वदेशी परतण्यापासून रोखण्यात आले आहे.

हैदराबादमधील रहिवासी सॉल्मन राज यांनी केंद्र सरकार, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे तात्काळ मदतीची विनंती केली आहे. राज यांनी व्हिडिओद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. आम्ही सर्वजण एका हॉटेलमध्ये राहत आहोत, आमच्याकडील पैसे संपत आले आहेत, वृद्धांना औषधांची गरज आहे. आम्ही केंद्र सरकार, तेलंगणा आणि आंध्र सरकारांना आवाहन करतो की आम्हाला लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढावे. येथील परिस्थिती ठीक नाही, असे सॉल्मन यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

हिंदुस्थानच्या दूतावासाकडून स्पष्ट आणि संपूर्ण माहिती मिळत नसल्याचे अडकलेल्या लोकांचे म्हणणे आहे. दूतावासाने त्यांना फक्त हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे, परंतु पुढील योजनेबद्दल कोणतीही अधिक माहिती दिली नाही. पैसे आणि औषधांच्या कमतरतेमुळे वृद्ध आणि आजारी लोक विशेषतः त्रस्त आहेत, असे एका पर्यटकाने सांगितले.

तेलंगणा सरकारने आधीच आखाती देशांमध्ये अडकलेल्या तेलुगू लोकांसाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. आंध्र प्रदेश सरकारने APNRTS द्वारे मदत देखील सुरू केली आहे आणि काही लोकांना मस्कतला जाण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारसह दोन्ही राज्य सरकारे परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.