
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली आहे. मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रेक्षकांनी गर्दी टाळण्यासाठी खाजगी वाहनांऐवजी लोकल ट्रेन (चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशन) किंवा मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) चा वापर करावा. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, परंतु प्रेक्षकांसाठी दुपारी 4 वाजल्यापासून स्टेडियमचे दरवाजे उघडले जातील, असे नियमावलीत म्हटले आहे.
नियमावलीत वाहतूक पोलिसांनी स्टेडियमच्या गेटनुसार प्रेक्षकांसाठी खालील मार्ग सुचवले आहेत.
1. गेट क्र. 1, 2 आणि 7 ने स्टेडियममध्ये जाण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्टेशन किंवा चर्चगेट मेट्रो स्टेशनवरून ‘ई रोड’ (E Road) मार्गे जावे.
2. गेट क्र. 3 आणि 4 ने आत जाण्यासाठी मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनजवळील ‘रूपकला शोरूम’ समोरील पादचारी पुलाचा (FOB) वापर करावा.
3. गेट क्र. 5 आणि 6 ने आत जाण्यासाठी महर्षी कर्वे रोडवरील इन्कम टॅक्स ऑफिससमोरील पादचारी पुलाचा वापर करून चर्चगेट स्टेशनवरून पोहोचावे.
मरीन ड्राईव्ह परिसरात संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी ‘एक्स’ वरून केले आहे.



























































