MOVIE REVIEW भावनांची रोलर कोस्टर राईड… आई आणि मुलींच्या नात्यातील जिव्हाळा आणि एक अनपेक्षित ट्विस्ट…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्वेता पवार- सोनावणे

एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते हे दाखवणारा एक भावनिक पण तितकाच धक्कादायक असा प्रवास म्हणजे ‘तिघी’ हा चित्रपट. भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे भावनांची रोलर कोस्टर राईड आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांना खिळवून टाकणारा इमोशनल ट्रॅक, कलाकारांचा तगडा अभिनय, जबरदस्त दिग्दर्शन आणि या सगळ्याला जोड मिळाली ती मनाला विचार करायला लावणाऱ्या संवादांची. त्यामुळे हा चित्रपट बघताना एकदाही नजर स्क्रीनवरून हटत नाही.

आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही प्रत्येक क्षणी जाणवणारा जिव्हाळा या सगळ्याचं प्रभावी चित्रण तिघी चित्रपटात पाहायला मिळतं. बॉसकडून 20 लाख उसणे घेतल्यामुळे कायम त्याच्या दबावात राहणारी, बॉसच्या घाणेरड्या नजरेपासून स्वत:ला वाचवताना तिची होणारी घालमेल, पतीचा नाकर्तेपणा, आईचं आजारपण, वडिलांबाबतच अर्धसत्य अशा अनेक गोष्टींचा सामना करत जगणारी ‘स्वाती’ नेहा पेंडसेने उत्तम रेखाटली आहे. घरातलं शेंडफळ असून जबाबादारीच्या ओझ्याखाली दबलेली सारिका म्हणजेच सोनाली पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन या चित्रपटातून जिंकणार आहे. आजारी आईची जबाबदारी घेताना होणारी फरफट, करिअरमधला गोंधळ तिने उत्तमरित्या स्क्रीनवर दाखवला आहे. आणि या चित्रपटाचा जीव असलेली भूमिका आहे ती भारती आचरेकर यांची. ‘पायी काटा, डोळा पाणी तरी कणा ताठ’ चित्रपटातील गाण्याच्या या ओळी त्यांच्यासाठीच लिहल्या आहेत. एक कणखर आई आपल्या भविष्याचा विचार न करता आपल्या मुलींसाठी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेते व तो कशा प्रकारे अमलात आणते हे त्यांनी उत्तमरित्या दाखवले आहे. या सगळ्यात मोठा ट्विस्ट चित्रपटाच्या शेवटी पाहायला मिळतो. तो प्रेक्षकांसाठी एक मोठा धक्का आहे.

”ताई तुला आठवतं लहानपणी मी एक चित्र काढलं होतं… तू, मी आणि आपल्या दोन्ही बाजूला आईच तेव्हा संपूर्ण वर्ग माझ्यावर हसला होता” हे वाक्य जेव्हा सोनाली कुलकर्णी बोलते तेव्हा तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणल्या शिवाय राहत नाही. प्राजक्त देशमुख यांनी लिहलेले जबरदस्त डायलॉग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. तसेच तरुण दिग्दर्शक जीजिविषा काळे यांनी चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जीव ओतला आहे. आईचं घर, हजार आठवणी… अशा टॅगलाईनने समोर येणारा तिघी हा चित्रपट तुमच्या मनात हजार आठवणी ठेवणार हे नक्की!