
आखाती देशांमधील संघर्षामुळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या देशात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत कोणतेही संकट नाही. देशात अंदाजे 50 दिवसांचा तेल आणि वायूचा साठा आहे, त्यामुळे जनतेला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. पेट्रोलियम मंत्रालय रशियासह जगातील अनेक प्रमुख कच्च्या तेल पुरवठादारांशी सतत संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही ठिकाणांहून पुरवठा थोडा कमी झाला असला तरी, तो पूर्णपणे विस्कळीत होणार नाही.
हिंदुस्थानातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी केवळ 40 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. उर्वरित 60 टक्के इतर देश आणि मार्गांमधून येतो. त्यामुळे होर्मुझ प्रदेशात समस्या असली तरी हिंदुस्थानला कोणत्याही मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकार दिवसातून दोनदा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. या बैठकांना पेट्रोलियम मंत्री आणि सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे अधिकारी उपस्थित असतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कतार आणि ओमानच्या सर्वोच्च नेतृत्वाशी देखील संपर्कात आहेत. हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) आणि अमेरिकन अधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तरी हिंदुस्थानातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर त्वरित परिणाम होणार नाही, असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय, सरकारने हे देखील नमूद केले आहे की, अमेरिका-इराण तणाव असूनही, देशातील खताच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.



























































