
अमेरिका-इस्रायल व इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल तब्बल 500 रुपये प्रति लिटर होणार असल्याची अफवा गेल्या दोन दिवसांपासून पसरली आहे. त्यामुळे अनेकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली होती. काहींनी तर पेट्रोल व डिझेल संपत आले असून लवकरच पेट्रोल पंप बंद होतील अशीही अफवा पसरवली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने ट्विट करत ही सर्व माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे.
”मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल ₹५००/- प्रति लिटर होईल किंवा पेट्रोल संपेल, हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. राज्य अथवा केंद्र शासन किंवा संबंधित तेल कंपन्यांकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या पेट्रोलचे दर सुमारे ₹१०४–₹१०५ प्रति लिटर आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये व अफवा पसरवणे टाळावे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा”, असे आवाहन राज्य सरकारकडून जनतेला करण्यात आले आहे.



























































