
वानखेडे मैदानावर शेवटच्या षटकापर्यंत झालेल्या थरारक लढतीत टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. जेकब बेथेल याच्या झुंझार शतकी खेळीनंतरही टीम इंडियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड संघाशी 8 मार्च रोजी होईल.
हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन यांच्या विस्फोटक अर्धशतकीय खेळीच्या बळावर 20 षटकांमध्ये 253 धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या तीन विकेट झटपट गेल्या. त्यामुळे हा सामना हिंदुस्थान मोठ्या फरकाने जिंकेल असे वाटत असतानाच जेकब बेथेल याने मैदानात शड्डू ठोकला. त्याला मधल्या फळीतील विल जॅक्स याने चांगली साथ दिली. एक वेळ सामना हिंदुस्थानच्या हातातून निसटतोय की काय असे वाटत असतानाच विल जॅक्स बाद झाला. त्यानंतरही बेथेल आणि सॅम करण यांनी जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र शेवटच्या षटकांमध्ये बुमराह याने लेझर यॉर्कर टाकत इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. शेवटच्या सहा चेंडूत 30 धावांची गरज असताना शिवम दुबे याने फक्त 23 धावा दिल्या आणि टीम इंडियाने अहमदाबादचे तिकीट मिळवले.



























































