
ICC T20 World Cup 2026 ची फायनल स्पर्धेतील दोन मातब्बर संघ हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रविवारी (8 मार्च) रंगणार आहे. विजेतेपदाची लढत सुरू होण्यापूर्वी शाब्दीक चकमकीला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने मोठं वक्तव्य करत टीम इंडियाला सुचना वजा इशारा दिला आहे.
फायनलचा थरार सुरू होण्यापू्र्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मिचेल सँटनरने आपली रोखठोक भुमिका मांडली. तसेच न्यूझीलंड विजेतेपद पटकावू शकतो, असा विश्वासही त्याने यावेळी बोलताना व्यक्त केला. त्याच्या या वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची आठवण आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. कारण पॅट कमिन्सने 2023 च्या वर्ल्ड कप फायनलपूर्वी असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. त्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव करत जेतेपद पटकावलं होतं.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, “आम्हाला माहित आहे की कदाचीत आम्ही फेव्हरिट नसू शकतो, पण त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. जर आम्ही छोट्या छोट्या गोष्टी योग्यरित्या केल्या आणि एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली तर आम्ही स्वतःला ट्रॉफी जिंकण्याच्या स्थितीत आणू शकतो. मात्र, यासाठी काहींचे हृदय तोडावे लागले तरी चालेल, आम्हाला काही अडचण नाही.” असं सँटनर म्हणाला आहे. तसेच हिंदुस्थानचे फलंदाज तुफान फॉर्मत असून गोलंदाजांना इंग्लंडविरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये संघर्ष करावा लागल्याच तो म्हणाला आहे. तसेच जो संघ चांगला खेळ करेल, तो वर्ल्ड कप उंचावेल, असही सँटनर म्हणाला आहे.


























































