प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये, कार्यकर्ते आणि जनतेसाठी काम करत राहणार – वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“राजकारणात प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये. जनतेने आपल्याला विरोधकाची भूमिका दिली आहे, ती आपण ठामपणे पार पाडूया. संघर्षाच्या काळात डगमगून न जाता शिवसेना पक्षातूनच कार्यकर्ते आणि जनतेसाठी मी काम करत राहणार आहे,” असा ठाम निर्धार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

कणकवली येथील ‘विजय भवन’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आगामी काळात नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत लाखो रुपये घेऊन विकल्या गेलेल्या आणि निवडणूक बिनविरोध करून पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या उमेदवारांची शिवसेना पक्षातून कायमची हकालपट्टी करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली आणि संघर्ष केला, त्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.