Nanded News – विधवा महिलेला उचलून नेत रात्रभर मारहाण; मुलाने 20 किमी चालत पोलीस स्थानक गाठलं, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

उमरी तालुक्यातील काबलगुडा खुर्द गावात एका विधवा महिलेला उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेला उचलून नेत डांबून रात्रभर मारहाण करण्यात आली आणि पाहाटे पाचच्या सुमारास पीडितेला घराबाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे उमरी तालुका हादरून गेला असून सर्वत्र संतापाची लाट आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मुलाने 20 किलोमीटर पायी चालत जात उमरी पोलीस स्टेशनला जात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काबलगुडा खुर्द येथील 40 वर्षीय पीडित महिला रात्री दहाच्या सुमारास स्वयंपाकासाठी पाणी आणायला गेल्या असता गावातीलच चौघांनी पीडितेचे तोंड आणि हातपाय दाबून धरत तिला उचलून घरात नेले. बराच वेळ झाला तरी आई घरी आली नाही म्हणून पीडितेचा मुलगा तिच्या शोधात घराबाहेर पडला. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर मुलाने आरोपीच्या घरी जाऊन आईला सोडवण्यासाठी प्रयत्न केला, परंतू त्याला भीती दाखवून पळवून लावण्यात आलं. सकाळी सहाच्या सुमारास पीडितेला मारहाण करत घराबाहेर काढण्यात आलं आणि तिची मंदिरापर्यंत धिंड काढण्यात आली. याचवेळी पीडितेने प्रसंगावधान साधत गावाबाहेर पळ काढला.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या मुलाने 20 किलोमीटर पायी चालत जात उमरी पोलीस स्थानक गाठले आणि पोलिसांनी सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज गोविंद काटलेवाड, अमोल मोहन काटलेवाड, मोहन दिगंबर काटलेवाड आणि दिगंबर काटलेवाड अशी आरोपींची नावे आहेत.