
इराणसोबत युद्धाचा भडका उडाल्यानंतर अमेरिकेने हिंदुस्थानला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली होती. 3 एप्रिलपर्यंत ही सूट देण्यात आली असून त्यानंतर हिंदुस्थान अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवेल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले होते. यावरून मोठा गदारोळही झाला होता. हिंदुस्थानने कधी, कुणाकडून तेल खरेदी करावे हे अमेरिका ठरवायला लागल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. याबाबत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला आहे.
मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली जागतिक ऊर्जा टंचाई आणि कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव कमी करण्यासाठी हिंदुस्थानला रशियन तेल खरेदीसाठी तात्पुरती सवलत देण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानवरील आणि जागतिक बाजारपेठेतील तेलाचा दबाव थोडा कमी करण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘एअर फोर्स वन’ विमानात पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांना हिंदुस्थानला दिलेल्या 30 दिवसांच्या विशेष सवलतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, तेल बाजारातील दबाव कमी करण्यासाठी मी हे केले आहे. आमच्याकडे तेलाचा मोठा साठा आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेणे आवश्यक होते. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनावर टीका केली. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मी भरले होते, परंतु बायडेन यांनी मतांच्या राजकारणासाठी त्याचा वापर केला, असा आरोप त्यांनी केला.
#WATCH | US President Donald Trump says, “…I would do it just to take a little of the pressure off…We’ve got a lot of oil. Our country has a tremendous amount, and we have, there’s a lot of oil out there…”
(Source: The White House/YouTube) https://t.co/1BALpbnfV6 pic.twitter.com/9YW29wjR9L
— ANI (@ANI) March 7, 2026
हिंदुस्थानला कुणाच्या परवानगीची गरज नाही!
दरम्यान, अमेरिकेच्या या विधानानंतर हिंदुस्थान सरकारने कडक भूमिका घेतली आहे. हिंदुस्थानला रशियन तेल खरेदी करण्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची कधीच गरज भासलेली नाही. अमेरिकेचा हा निर्णय केवळ प्रक्रियेतील अडथळे दूर करणारा आहे, तो हिंदुस्थानचे धोरण ठरवू शकत नाही, असे सरकारमधील अधिकाऱ्याने म्हटले. अमेरिकेचे निर्बंध असूनही हिंदुस्थानने नेहमीच आपल्या देशाच्या हिताचा विचार करून रशियन तेल खरेदी सुरू ठेवली आहे. गेल्या 12 वर्षांत देशातील एकही पेट्रोल पंप कोरडा पडलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
इराणच्या अणुसाठ्यावर अमेरिका-इस्रायलची नजर; स्पेशल फोर्स पाठवण्याच्या योजनेवर चर्चा




























































