
इराण आणि इस्रायलमध्ये भडकलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम आता शेजारील देशांवर दिसू लागले असून, पाकिस्तानमध्ये भीषण इंधन संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकारने देशात इंधन आणीबाणी सदृश परिस्थिती जाहीर केली असून इंधन बचतीसाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या संकटामुळे संपूर्ण पाकिस्तानात दोन आठवड्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकारी कामकाजाच्या पद्धतीतही मोठे बदल करण्यात आले आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग धोक्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या तेल आयातीवर झाला आहे. देशातील इंधन साठा झपाट्याने कमी होत असल्याने सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून आठवड्यातील कामकाजाचे दिवस पाचऐवजी चार केले आहेत. उर्वरित दिवसांसाठी वर्क फ्रॉम होम धोरण लागू करण्यात आले असून सरकारी अधिकाऱ्यांच्या इंधन भत्त्यात ५० टक्क्यांची मोठी कपात करण्यात आली आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, युद्धाच्या सावटाखाली असलेल्या या क्षेत्रात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी हे कटू निर्णय घेणे अनिवार्य आहे. इंधनाचा वापर किमान पातळीवर आणण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना पुढील १४ दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा लॉकडाउन सारखी शांतता पसरली असून, आगामी काळात हे संकट अधिक गडद झाल्यास आणखी कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


























































