
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनाच्या आधी स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन आज मंत्री आशीष शेलार यांनी विधान परिषदेत दिले. याशिवाय पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील शेलार यांनी दिली.
विधान परिषदेमध्ये आमदार श्रीकांत भारतीय यांनी आज लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या लक्षवेधीमध्ये त्यांनी पत्रकार आणि वृत्तपत्र विद्यार्थ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, कोरोनानंतर वृत्तपत्र क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी, त्यातून निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न, बाळशास्त्राr जांभेकर यांच्या नावाने असलेल्या योजनेचे प्रस्ताव रखडणे, वर्तमानपत्र खरेदी करणारे, वाचकांना आयकरात सूट देणे अशा विविध विषयांकडे लक्ष वेधले होते. याला मंत्री शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही
आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी आचार्य बाळशास्त्राr जांभेकर पेन्शन योजनेतील विलंब व काही अटी–शर्तींबाबत प्रश्न उपस्थित केले. पत्रकारांच्या समस्यांबाबत ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी आणि वसंत मुंडे यांच्या समितीने केलेल्या सूचनांवर शासन कार्यवाही करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.



























































