
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळताना अंगावर पाणी उडवले म्हणून एका तरुणाने पाच लहान मुलांवर उकळते तेल फेकले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यात पाचही मुलं गंभीर भाजली असून त्यांना उपचारासाठी लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर द्रगपालखेडा गावातील एका वृद्धाचं निधन झालं. त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम मंगळवारी सुरू होता. तेराव्या जेवणासाठी आचारी पुऱ्या तळत होता. याचदरम्यान पाच लहान मुलं तेथेच आसपास खेळत होती. खेळताना त्यांनी विशाल नामक तरुणावर पाणी उडवले. यामुळ विशाल संतापला आणि त्याने पाचही मुलांच्या अंगावर कढईतील उकळते तेल फेकले.
गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत जखमी मुलांना लखनऊ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लखनऊ येथील मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.



























































