सिलेंडरच्या रांगेचा आणखी एक बळी, उत्तर प्रदेशमध्ये तीन तास रांगेत उभ्या वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिलेंडरच्या तुटवड्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी सिलेंडरचा काळा बाजार होत आहे. अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडरसाठी एक किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. पंजाबमध्ये सिलेंडरच्या रांगेत उभ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशमध्येही अशा प्रकारची घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद येथे एका वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुख्तार अंसारी असे त्या व्यक्तीचे नाव होते. ते 75 वर्षांचे होते. मुख्तार अंसारी व त्यांचा मुलगा शहानवाज हे शनिवारी सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर रांगेत उभे होते. तब्बल तीन तास रांगेत राहुनही त्यांना सिलेंडर मिळाला नव्हता. त्याच वेळी अचानक अंसारी हे बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शुक्रवारी पंजाबमधील बरनाला जिल्ह्यात शैहना गावात दोन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या ६६ वर्षीय कुमार मित्तल यांचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, गॅस मिळत नसल्याने पंजाबमधील लुधियाना येथे एजंसीच्या गोदामातून लोकांनी चक्क गॅस सिलिंडर पळवून नेले.