
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी कोणते विधान करतील याचा भरवसा नाही. आखाती देशांमधील संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या वक्तव्याने युद्धाची ठिणगी अधिकच पेटली आहे. अमेरिकेने केलेल्या एका मोठ्या लष्करी कारवाईत इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खार्ग बेटाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या दाव्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असतानाच, ट्रम्प यांनी दिलेली धमकी अधिक प्रक्षोभक मानली जात आहे. ‘आम्ही केवळ मनोरंजनासाठी देखील या बेटाला पुन्हा एकदा लक्ष्य करू शकतो,’ असे विधान ट्रम्प यांनी केल्याने तणाव कमालीचा वाढला आहे.
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी मित्र राष्ट्रांना आपल्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले आहे. जगातील तेल आणि वायू पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, तो सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका संबंधित देशांशी समन्वय साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ट्रम्प प्रशासनाने मध्यपूर्वेतील मित्र राष्ट्रांकडून करण्यात आलेले शांततेचे आणि वाटाघाटींचे प्रस्ताव फेटाळून लावल्याचे समजते, ज्यामुळे राजनैतिक मार्गाने युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
इराणच्या खनिज तेल निर्यातीसाठी खार्ग बेट हे मुख्य केंद्र मानले जाते, त्यामुळे या बेटावर झालेला हल्ला इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा घाला घालणारा ठरला आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या धमकीने खवळलेल्या इराणने थेट पलटवार करत, अमेरिकेच्या या कृत्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागेल, अशी चेतावणी दिली आहे. या दोन्ही देशांमधील वाढत्या युद्धामुळे आणि प्रत्यक्ष लष्करी हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील शांतता पूर्णपणे धोक्यात आली असून, आता हे संकट जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत 2 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, यात प्रामुख्याने इराणी नागरिकांचा समावेश आहे. इस्फहान शहरातील एका कारखान्यावर झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा बळी गेला आहे. इराणने यूएईमधील नागरिकांना अमेरिकन तळ आणि बंदरे रिकामी करण्यास सांगितले आहे, तर यूएईने आपल्या हद्दीतून इराणवर हल्ले झाल्याचा दावा फेटाळला आहे. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून ऊर्जेच्या किमती सातत्याने वाढत आहेत.




























































