America Israel- Iran War- होर्मुझमध्ये ‘पेट्रोलिंग’साठी ट्रम्प यांना हवी इतर देशांची मदत, केलं एकत्रं येण्याचं आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donald trump claims saving 35 million lives in india pakistan operation sindoor | saamana

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज युद्धाचा 17 वा दिवस असून याचा सर्वाधिक फटका ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या सागरी मार्गाला बसला आहे. येथील जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  या पार्श्वभूमीवर, व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू’ असा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना दिला आहे. याबाबत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सविस्तर वृत्त दिले आहे.

हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल पुरवठ्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जगातील एकूण तेलाच्या 20 टक्के पुरवठा याच मार्गातून होतो. मात्र, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि इराणने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर हा मार्ग मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बंद आहे. यामुळे जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असून जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट ओढवले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांना आपापल्या युद्धनौका या भागात पाठवण्याचे आवाहन केले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी चीन एक सकारात्मक भागीदार म्हणून समोर येईल. मात्र, इतर देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी सांगितले आहे.

या प्रस्तावावर विविध देशांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. तर फ्रान्सने परिस्थिती निवळल्यावरच मोहिमेत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, जर्मनीने या संघर्षात थेट सक्रिय होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दक्षिण कोरिया आणि जपान अजूनही या परिस्थितीचा आढावा घेत असून, लवकरच जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.