पश्चिम बंगालमध्ये जे घडत आहे, तेच यापूर्वी दिल्लीच्या निवडणुकीतही घडले; भाजपवर टीका करत काय म्हणाले केजरीवाल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील वरिष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आता हिंदुस्तानातील राजकारण तापले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली असून, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगावर केलेल्या आरोपांना केजरीवाल यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, “भाजपने बेईमानीने निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाला आपले हत्यार बनवले आहे. ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये मुख्य सचिव आणि डीजीपींसह ५० हून अधिक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यावरून लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे.”

आपल्या टीकेदरम्यान केजरीवाल यांनी दिल्लीत घडलेल्या जुन्या घटनांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “जे आज पश्चिम बंगालमध्ये घडत आहे, तेच यापूर्वी दिल्लीच्या निवडणुकीतही घडले होते. त्यावेळीही मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे कापली गेली होती आणि संपूर्ण पोलीस प्रशासन भाजपच्या गुंडागिरीला शह देण्यासाठी वापरले गेले होते. आज ममता दीदी लोकशाही वाचवण्यासाठी जो लढा देत आहेत, त्यामध्ये आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.”

निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी काम करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असून, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.