इराणला पुन्हा मोठा धक्का, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणी सैन्याचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यात इराणला मोठा धक्का बसला असून इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नैनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणने दिली आहे.

अली मोहम्मद नैनी हे IRGC चे प्रवक्ते आणि जनसंपर्क विभागाचे उपप्रमुख होते. जुलै 2024 मध्ये IRGC चे कमांडर-इन-चीफ हुसैन सलामी यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. 1957 साली जन्मलेले नैनी हे इराण-इराक युद्धातील अनुभवी सैनिक होते आणि त्या युद्धात ते जखमीही झाले होते.

ब्रिगेडियर जनरल पदावर कार्यरत असलेले नैनी IRGC च्या वतीने नियमितपणे निवेदने जारी करत असत. त्यामध्ये इराणच्या लष्करी तयारीबाबत तसेच क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेबाबत ते वारंवार इशारे देत असत.

मार्च 2026 च्या मध्यात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी इराण किमान सहा महिने युद्ध लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला होता. तसेच अनेक नवीन तंत्रज्ञानाची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अद्याप वापरले गेले नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

इराण-इराक युद्ध (1980-88) काळात नैनी यांनी सुमारे आठ वर्षे विविध भूमिकांमध्ये फ्रंटलाइनवर सेवा बजावली होती. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी क़द्र बटालियनमध्ये जनसंपर्क प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर सर्पोल-ए जहाब येथील अबूजर बॅरकमध्ये त्यांनी जनसंपर्क आणि ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळली. पुढे नजफ मुख्यालयात फ्रंटलाइन प्रचार विभागाचे उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

दरम्यान, इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी इराणमधील 130 हून अधिक लष्करी आणि संबंधित पायाभूत ठिकाणांवर हल्ले केले आहेत. यामध्ये पश्चिम आणि मध्य इराणमधील बॅलिस्टिक मिसाईल साइट्स, UAV (ड्रोन) तळ तसेच संरक्षण यंत्रणांचा समावेश आहे.

इस्रायली लष्कराने सांगितले की, पश्चिम आणि मध्य इराणमध्ये हवाई हल्ले सुरू असून इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांची व्याप्ती कमी करण्यासाठी आणि हवाई वर्चस्व वाढवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.