
भाजपच्या स्वीकृत सदस्याने आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामासाठी चक्क 28 प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे सदस्य पुन्हा आमनेसामने आले. सभागृह नेते सागर नाईक यांनी महापालिका अधिनियमांचा जोरदार होमवर्क केल्यामुळे महासभेच्या कामकाजात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे सदस्य हैराण झाले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या आणि शिंदे गटाच्या अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामध्ये तुर्भे नाका परिसरातील अमित मेढकर यांचाही समावेश आहे. निवडणुकीत अपयशी झालेले मेढकर यांची भाजपने स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावली आहे. मेढकर यांनी शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या पॅनलमध्ये चक्क विकासकामांचे 28 ठराव मांडले. हे ठराव महासभेच्या पटलावर आल्यानंतर शिंदे गटाचे सुरेश कुलकर्णी, चंद्रकांत आगोंडे यांच्या संतापाचा भडका उडाला.




























































