देशाची राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि ट्रफिक समस्यांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील रस्त्यांचा वापर करणाऱया बाहेरील वाहनांवर लागणाऱ्या ग्रीन टॅक्समध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. याचा सर्वात जास्त परिणाम ट्रक आणि अशा गाडय़ांवर होणार आहे जे दुसऱया राज्यांकडे जाताना दिल्लीतील रस्त्याचा शॉर्टकटसाठी वापर करतात. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर दिल्लीत एन्ट्री करण्यासाठी आता ट्रक चालकाला जास्त पैसे मोजावे लागतील. याआधी ट्रक चालक ग्रीन टॅक्स म्हणून 2600 रुपये मोजत होता, परंतु आता 1 एप्रिलपासून 4 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठीसुद्धा शुल्क वाढवले असून प्रति कार 2 हजार रुपये द्यावे लागतील.



























































