
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ ने १५ दिवसांत आपल्या बजेटच्या कित्येक पटींनी कमाई करत, १५०० कोटींच्या जवळ पोहोचून अनेक विक्रम मोडले. रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन अभिनीत ‘धुरंधर २’ ने बॉक्स ऑफिसवर दुसरा आठवडा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
काही चित्रपट फक्त प्रदर्शित होतात, काही चर्चेत राहतात… आणि काही प्रदर्शित होताच धुमाकूळ घालतात. ‘धुरंधर २’ हा अशाच चित्रपटांपैकी एक आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट इतका प्रचंड यशस्वी झाला की त्याने अनेक जुने बॉक्स ऑफिस विक्रम मोडीत काढले. ‘केजीएफ’, ‘केजीएफ २’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली २’, ‘ॲनिमल’, ‘स्त्री २’ आणि ‘गदर २’ यांसारख्या चित्रपटांचे विक्रम मागे टाकले.
आता अवघ्या १४ दिवसांत, ‘धुरंधर’चे कलेक्शन ‘पुष्पा २’च्या जगभरातील कलेक्शनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. चाहत्यांचा प्रचंड उत्साह, ॲडव्हान्स बुकिंगसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि चित्रपटगृहांमधील हाऊसफुल गर्दी, या सर्व गोष्टी १५ दिवसांनंतरही चित्रपटाच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसते. रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या जोडीने हे सिद्ध केले आहे की सिक्वेल पहिल्या भागापेक्षा खूप मोठा आणि यशस्वी ठरू शकतो.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील दुसऱ्या आठवड्यातील सर्वाधिक कमाईचा विक्रमही रचला आहे. प्रदर्शनाच्या १५ व्या दिवशी, चित्रपटाला हनुमान जयंतीच्या सुट्टीचा फायदा झाला. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून रणवीर सिंगचा हा स्पाय थ्रिलर देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या काळात चित्रपटाने प्रचंड कमाई करून सर्व बॉलिवूडमधील ख्यातनाम चित्रपटांना मागे टाकले आहे आणि अनेक विक्रमही मोडले आहेत.
सॅकनिल्कच्या (SacNilk) सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धुरंधर २’ ने गुरुवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या १५ व्या दिवशी, ₹१७.८० कोटींची कमाई केली आहे. यामुळे, त्याच्या दुसऱ्या आठवड्याची एकूण कमाई ₹२६३.१५ कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ₹६७४.१७ कोटी कमावले होते. आता या चित्रपटाची हिंदुस्थानातील कमाई ही ₹९३७.३२ कोटी पोहोचली आहे. केवळ दुसऱ्या आठवड्यात, ‘धुरंधर २’ ने बॉक्स ऑफिसवर ₹२६३.१५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने त्याच्या आधीच्या ‘धुरंधर’ला मागे टाकले आहे आणि दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनून इतिहास रचला आहे.




























































