सांगली जिल्ह्यात दर दोन व्यक्तींमागे एक वाहन; जिल्ह्यात मार्चअखेर वाहनांची संख्या पोहोचली 14 लाखांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रकाश कांबळे

गेल्या 10 वर्षांत वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येची तुलना करता दर दोन व्यक्तींमागे एक वाहन असे चित्र दिसून येते. दररोज शेकडो गाडय़ा नव्याने रस्त्यावर धावताना दिसतात. जिल्ह्यातील वाहनांची संख्या मार्च 2026 अखेर 14 लाख 62 हजार 345 इतकी आहे.

प्रत्येकाला आपल्या दारात गाडी असावी असे वाटत असते. नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी तसेच दैनंदिन कामासाठी प्रत्येकाला दुचाकीची आवश्यकता भासते. दुचाकीच्या किमती गेल्या तीन-चार वर्षांत वाढल्या आहेत. तरीही दुचाकींची विक्री वाढतच चालली आहे. दुचाकीसाठी फायनान्स कंपन्या तत्काळ कर्जपुरवठा करतात. त्यामुळे अनेकांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. एकीकडे दुचाकींची संख्या वाढत असताना रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे.

वाहतूककोंडी, वाढत्या अपघातांचे आव्हान

गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढल्यामुळे रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, प्रदूषण वाढले आहे. अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

गरज, क्रयशक्ती आणि हप्त्यांची जादू

लोकांची दैनंदिन गरज आणि क्रयशक्ती वाढली आहे. फायनान्स कंपन्यांकडूनही कर्जपुरवठा केला जातो. मार्च महिन्यात 9 हजार 684 वाहनांची विक्री झाली.

जिल्ह्यात एक लाख लोकसंख्येमागे 47 हजार वाहने

सांगली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 31 लाखांहून अधिक आहे. त्याच्याशी वाहन संख्येची तुलना केल्यास एक लाख लोकसंख्येमागे 47 हजार वाहने आहेत. जिल्ह्यातील वाहनांची संख्या मार्च 2026 अखेर 14 लाख 62 हजार 345 इतकी आहे. त्यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक 10 लाख 79 हजार 737 इतकी आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येक घरटी एक वाहन होते. परंतु गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. आता घरटी एक नव्हे, दोन-तीन वाहने सर्रास दिसून येतात.

गेल्या 10 वर्षांत तिप्पट भर

लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या विचारात घेतली तर पूर्वी सहा व्यक्तींमागे एक वाहन होते. सध्या दोन व्यक्तींमागे एक वाहन असे प्रमाण आहे. दहा वर्षांत तिपटीने वाहनसंख्या वाढली आहे.