
इराणसोबत सुरू असलेले युद्ध लांबल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम ढासळू लागला आहे. महिनाभराहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या युद्धातून हवे ते हाती लागत नसल्याने ट्रम्प यांनी थेट इराणला बेचिराख करण्याची धमकी दिली. इराणच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन संपण्यापूर्वी इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून दिलेला 15 कलमी युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने अधिकृतपणे फेटाळला असून युद्ध कायमचे संपवण्यासाठी 10 अटी ठेवल्या आहेत.
आम्ही केवळ तात्पुरता युद्धविराम स्वीकारणार नाही. आम्हाला युद्ध कायमचे संपवायचे आहे आणि भविष्यात आमच्यावर हल्ले होणार नाहीत, याची खात्री हवी आहे, असे कैरोमधील इराणच्या राजनैतिक मोहिमेचे प्रमुख मुजतबा फिरदोसी पूर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानच्या मध्यस्थीने पाठवलेला युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला. एवढेच नाही तर शांततेसाठी 10 कलमी आराखडाही मांडला.
इराणने ठेवलेल्या 10 अटी
1. कायमस्वरूपी युद्धबंदी – युद्ध केवळ इराणमध्येच नाही, तर लेबनॉन आणि गाझा पट्टीतही पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबवावे.
2. हॉर्मुज सामुद्रधुनीवर ताबा – जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या हॉर्मुज सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) इराणच्या नियंत्रणास मान्यता द्यावी.
3. प्रवेश शुल्क – होर्मुजमार्गे जाणाऱ्या जहाजांचे नियमन करण्याचा आणि त्यांच्याकडून टोल गोळा करण्याचा अधिकार इराणला असावा.
4. आर्थिक निर्बंध हटवणे – इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध तात्काळ आणि पूर्णपणे मागे घ्यावेत.
5. युरेनियम समृद्धीचा अधिकार – ‘अण्वस्त्र प्रसारबंदी करारा’नुसार इराणला युरेनियम समृद्ध करण्याचा अधिकार असल्याचे अधिकृतपणे मान्य करावे.
6. नुकसानभरपाई – युद्धामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई अमेरिकेने द्यावी.
7. सुरक्षेची हमी – भविष्यात इराणवर पुन्हा कधीही हल्ला केला जाणार नाही, याची लेखी आणि ठोस हमी द्यावी.
8. प्रादेशिक स्वायत्तता – आखाती देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये पाश्चात्य देशांचा हस्तक्षेप नसावा.
9. हवाई क्षेत्राचे संरक्षण – इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन थांबवण्याची खात्री द्यावी.
10. पायाभूत सुविधांची सुरक्षा – तेल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करणे थांबवावे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मला हे संपवायचे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही आत्ताही तिथून बाहेर पडू शकतो आणि इराणला पूर्वपदावर येण्यासाठी अनेक वर्षे लागतील. पण मला हे प्रकरण पूर्णपणे संपवायचे आहे, असे ट्रम्प म्हणाले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.



























































