
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात अनियमिततेच्या दोन तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार याची चौकशी सुरू करण्यात आली, असे प्रतिज्ञापत्र अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) उच्च न्यायालयात सादर केले आहे.
एनसीबीचे उप महासंचालक विशाल सानप यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रतिज्ञापत्राचा तपशील समजून घेण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती वानखेडेंचे वकील राजीव चव्हाण यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली.
सुशांत सिंग राजपूतसह अन्य तपासावर ठपका
– अभिनेता सुशांत सिंह राजपूत व अन्य ड्रग्स् प्रकरणाचा तपास वानखेडे हे एनसीबीचे प्रमुख असताना झाला. यात अनियमितता झाल्याचा आरोप झाल्याचे एनसीबीने याची स्वतंत्र चौकशी सुरू केली. याविरोधात वानखेडेंनी याचिका दाखल केली आहे. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्यानंतर मला टार्गेट केले जात असल्याचे वानखेडेंचे म्हणणे आहे.
वानखेडे तपासाला उशीर करताहेत
– आम्ही केवळ प्राथमिक चौकशी करत आहोत. आम्ही वानखेडेंना बाजू मांडण्याची संधी देत आहोत. ते याचिका दाखल करून चौकशीला उशीर करत आहेत, असे एनसीबीने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.



























































