
बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठे सत्तांतर घडले असून, माजी कर्णधार तमिम इक्बालची बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या (बीसीबी)च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने अमीनुल इस्लाम बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त करत हा धडक निर्णय घेतला.
काय आहे प्रकरण…
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या बीसीबी निवडणुकांमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी पाच सदस्यीय समितीने केली होती. त्यानंतरच्या शिफारसींवरून सरकारने हस्तक्षेप करत संपूर्ण बोर्ड बरखास्त केले.
37 वर्षीय तमिम इकबाल आता बीसीबीचा सर्वात युवा अध्यक्ष ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय अॅड-हॉक समिती काम पाहणार असून, त्यात मिनहाजुल आबेदिन, अतहर अली खान यांसारख्या अनुभवी क्रिकेट व्यक्तींचा समावेश आहे.
बीसीबी बरखास्त करण्याचा सरकारचा निर्णय
राष्ट्रीय क्रीडा परिषदेनुसार पूर्वीचे मंडळ योग्य पद्धतीने स्थापन झाले नव्हते आणि ते प्रभावीपणे कार्यही करू शकत नव्हते. या निर्णयाची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) देण्यात आली आहे. बीसीबीच्या या निर्णयाला आयसीसीची मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.






























































