७ दिवसांत ‘तिसरी भाषा’ शिकवण्यास सुरुवात करा, CBSE चे शाळांना निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्राला विरोध असतानाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशातील आपल्या सर्व संलग्न शाळांना येत्या सात दिवसांत तिसरी भाषा शिकवण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

यातच इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या या तिसऱ्या भाषेची नवीन पाठ्यपुस्तके NCERT कडून अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेली नाहीत. असे असतानाही, सीबीएसईने शाळांना अधिक वेळ न देता केवळ एका आठवड्याची मुदत दिली असून तिसरी भाषा शिकवण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.

CBSE ने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “अनेक शाळांनी आधीच तिसरी भाषा लागू करण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी हे परिपत्रक जारी झाल्यापासून ७ दिवसांच्या आत त्याचे पालन सुनिश्चित करावे.” अधिकृत पुस्तके येईपर्यंत शाळांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून अध्यापन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

या अचानक आलेल्या आदेशामुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळाचे वातावरण आहे. अनेक शाळांना अद्याप या तिसऱ्या भाषेसाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करता आलेली नाही, तसेच शैक्षणिक वर्षाच्या मध्यात वेळापत्रकाचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांकडून विचारला जात आहे.