
IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज संजू सॅमसन सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या संजूला IPL मध्ये अद्याप सुर गवसलेला नाही. मात्र, त्याने आपल्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. केरळमधील मुंदूर-थुथा रोडवर प्रवास करत असताना सॅमसनने एका क्रिकेटप्रेमी चाहत्याला तब्बल 40 हजार रुपये किमतीचा नवीन स्मार्टफोन भेट देऊन सर्वांना चकित केले. एका रस्त्याच्या कडेला झालेल्या या अनपेक्षित भेटीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
ही घटना पलक्कड येथील पुंचप्पाडम स्कूलजवळ घडली. संजू कोझिकोडहून कोईम्बतूरला जात असताना फोनवर बोलण्यासाठी त्याने आपली गाडी थांबवली होती. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या शबरीशने या तरुणाने संजूला ओळखले. सॅमसनने केवळ त्यांच्याशी गप्पाच मारल्या नाहीत, तर शबरीशच्या फोनचा डिस्प्ले खराब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच आपल्या गाडीतील एक नवीन फोन काढून शबरीशला भेट दिला. या हृदयस्पर्शी कृतीमुळे शबरीश आणि त्याचे मित्र भारावून गेले.
SANJU SAMSON – A Heart of Gold
Sanju is in Kerala right now to cast his vote for the upcoming state elections. A fan boy met him and tried to click a selfie. Sanju noticed that his phone had display lines on it and asked him what happened to his phone. The boy said he… pic.twitter.com/eNwsBORVnK
— Deepu (@deepu_drops) April 8, 2026
एकीकडे मैदानाबाहेर संजूचे कौतुक होत असताना, मैदानातील त्याची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएल 2026 च्या पहिल्या तीन सामन्यांत त्याने केवळ 6, 7 आणि 9 अशा धावा केल्या आहेत. त्याच्या या खराब फॉर्मचा फटका चेन्नई सुपर किंग्सलाही बसला असून, संघाने सलग तीन सामने गमावले आहेत. मात्र, कठीण काळातही संजूने दाखवलेल्या या दातृत्वामुळे चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.





























































